वाशिम - अमरावती-पुसद (Amravati Pusad Highway) महामार्गावरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून (inauguration of flyover) भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते (BJP Vs Shivsena) आमनेसामने आले होते. तीन दिवसाअगोदर भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात उड्डाणपुलाचं उद्घाटन करून वाहतूक सुरू झाली होती. मात्र, काही तासात प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आज बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा पुलाचे ई उद्घाटन केले.
कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादासाठी जोरदार घोषणाबाजी : वाशिम येथे बुलडाणा येथील शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हे हजर होते. शिवसेना कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांनी श्रेयवादासाठी जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी स्थिती हाताळत हा तणाव निवळला. यावेळी भाजपा आणि शिवसेनेने फटाक्यांची आतिषबाजी केली.