वाशिम - शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्डयात पडून अनेकजण जखमी झाले आहेत. तर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहेत. विकासाच्या नावाखाली वाशिम शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांना मोठी दुखापतही झाली आहे. परंतु नगर परिषद प्रशासनाने याकडे कानाडोळा करुन झोपेचे सोंग घेतले आहे. न.प. च्या या कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टीने आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. याअंतर्गत आज आमदार लखन मलीक यांच्या नेतृत्वात शहरात खड्ड्यांचे पूजन करून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
खड्ड्यात उतरून आरती करीत जागरण गोंधळ आंदोलन
वाशिम शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी स्थानिक आमदार लखन मलिक यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र नगर परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नसून, अद्यापही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या आमदार लखन मलिक यांच्या नैतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने खड्ड्यात उतरून आरती करीत जागरण गोंधळ आंदोलन केले. स्थानिक शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शहरातील रस्त्याची वेळीच दुरुस्ती केली नाही तर यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे यावेळी आमदार लखन मलिक यांनी सांगितले.
हेही वाचा - भाजपला घाबरणाऱ्यांना पक्षाबाहेर हाकला, आपल्याला निडर लोक हवेत - राहुल गांधी