वाशिम-यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक अडचण येऊ नये, म्हणून 1600 कोटी रुपये पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. मात्र, आतापर्यंत 403 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. या परिस्थितीतही जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत संथगतीने कर्ज वाटप सुरु असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांपैकी केवळ 54 हजार शेतकऱ्यांना 1600 कोटींपैकी 403 कोटी एवढे कर्ज वाटप झाले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने 263 कोटी तर इतर 17 राष्ट्रीय आणि खासगी बँकांनी केवळ 140 कोटी असे एकूण 403 कोटींचे कर्ज वाटप केले.
जिल्ह्यातील पात्र असलेल्या 54 हजार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळाले आहे. उर्वरित शेतकरी कर्ज मिळावे म्हणून बँकांचे उंबरठे झिजवत आहेत मात्र अनेकांच्या पदरी निराशाच पडत आहे.
ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार देतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नंतरही जर कर्ज वाटपाची गती अशीच राहिली तर शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
15 जूनला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पीक कर्ज वितरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी जवळपास ३०७ कोटी रुपये पीक कर्ज वितरण झाले होते. बँकेने प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने बँकनिहाय आढावा घेवून संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, असे पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगितले होते.
जिल्हाधिकारी ह्रषीकेश मोडक यांनी पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्यासाठी प्रत्येक आठवड्यात बँकांची बैठक घेतली जात आहे. लवकरच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांची बैठक घेवून पीक कर्ज वितरणाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,अशी माहिती दिली होती. मात्र, गेल्या 10 दिवसात 100 कोटी रुपयांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.