वाशिम- कारंजा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. तरीही यावर कारवाई केल्या जात नसल्याची सर्वत्र ओरड होत आहे. येथील ठाणेदारांच्या वरदहस्ताने हे सर्व सुरु असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये विशेष पथकाने बुधवारी येथील वरली मटका अड्यावर कारवाई केली. कारवाईत एकूण ९९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारंजा-लाड परिसरातील मटका अड्यावर छापा
या बाबत सविस्तर माहीती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून वाशिम जिल्ह्यातील कारंजा-लाड परिसरातील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यावर पोलीस कारवाई होत नव्हती. अनेकांनी याची येथील ठाणेदारांकडे तक्रार दाखल केली. तरीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे बुधवारी अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कारवाईचे आदेश दिले. आदेशानुसार पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या विशेष पथकाने कारंजा येथील जयस्तंभ चौक येथे असलेल्या मुकेश रॉय यांच्या वरली मटका क्लब वर छापा मारला .
९९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
या ठिकाणी पोलीसांनी गिरीश पुनमचंद रॉय व वरली मटका खेळण्याकरीता आलेल्या ३४ लोकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ८१ हजार ३४० रुपये रोख रक्कम व १८ हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल असा ९९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने शहर व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, कारंजा-लाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांची पोलीस नियंत्रण कक्षात तातडीने बदली करण्यात आली आहे. या कारवाईने अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले असून रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरुच होती .