वाशिम - अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे झोडगा गावापासून ते सावरगाव बर्डेपर्यंत वाहनधारकांना दररोज वाहतूक कोंडी व धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या परिसरातील महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे. तसेच काम सुरु असलेल्या काळात दिवसातून तीन वेळेस महामार्गावर पाणी शिंपडण्याची मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
मागील एक वर्षापासून अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी पूर्वीचा महामार्ग दोन्ही बाजूने उकरून टाकला आहे. उकरलेल्या एकाबाजूने सिमेंट महामार्ग बांधणीचे काम संथ गतीने सुरु आहे. तर दुसरी बाजू वाहतूकीसाठी मोकळी सोडली आहे. या उकरलेल्या रस्त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
आरोग्यास धोका होण्याची भीती -
एकेरी रस्त्यावर वाहनांची वर्दळ होत असल्याने महामार्गावर धुळीचे मोठमोठे लोट उठून या धुळीचा वाहनधारकांसह अमानी, झोडगा खु, झोडगा बु व सावरगाव बर्डे या परिसरात राहणार्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरील परिसराच 24 तास धुळीचे साम्राज्य असते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना शारीरिक व्याधी जडून त्यांच्या आरोग्यास धोका होण्याची भीती वाटत आहे. या परिसरातील महामार्गावर दिवसातून तीन वेळेस पाणी शिंपडण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.