वाशिम - यंदा खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शेतकऱ्यांकडून कृषी सेवा केंद्राला जबाबदार धरले जात आहे. त्यातच कृषी विभागातील वरिष्ठांचा दबाव कृषी सेवा केंद्रवार वाढत आहे. त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून वाशिम जिल्ह्यातील सर्वच कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालक संघटनेने घेतला आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना याचा त्रास होणार आहे.
पेरलेले बियाणे न उगवल्यासंदर्भात शेतकरी व कृषी सेवा केंद्र संचालकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. हा गैरसमज दूर व्हावा, बोगस बियाणे प्रकरणी कृषी सेवा केंद्र संचालकांना जबाबदार धरण्यात येऊ नये, शेतकऱ्यांकडून शिवीगाळ व मारहाण होण्याच्या शक्यतेने संरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी बंद पुकारला आहे. पहिल्याच दिवशी बंदला १०० टक्के प्रतिसाद लाभलाचा दावा संघटनेने केला आहे. दुसरीकडे बियाणे, कीटकनाशक व अन्य कृषीविषयक साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची अडचण झाली.