वाशिम - कष्ट करण्याची उमेद व जिद्द वयासह कुठल्याही अडचणींवर सहज मात करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण वाशिम जिल्ह्यातील तांदळी शेवई येथे पाहावयास मिळाले. आर्थिक चणचणीमुळे बैल विकत घेण्याची परिस्थिती नसल्याने एका ६८ वर्षीय शेतकऱ्याने वयोवृद्ध पत्नीच्या सहाय्याने आपल्या शेतात डवरणीला सुरुवात केली आहे.
वाशिममध्ये बैलजोडी नसल्याने शेतकऱ्याची पत्नीच्या मदतीने डवरणी तांदळी शेवई येथील आत्माराम नवघरे यांच्याकडे दीड एकर शेत जमीन आहे. पण बैलजोडी नसल्याने स्वत:च पत्नीच्या मदतीने डवरणी करत आहेत. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने भाड्याने डवरणी करण्यासाठी सोय नाही म्हणून वयोवृद्ध दाम्पत्य स्वतः औताला जुंपून डवरणी करीत आहेत. वाशिममध्ये बैलजोडी नसल्याने शेतकऱ्याची पत्नीच्या मदतीने डवरणी या शेतीच्या भरवशावरच आत्माराम नवघरे आणि त्यांच्या पत्नीचा उदरनिर्वाह होतो. जेमतेम दीड एकर शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. मात्र, दुसरा पर्याय नसल्याने शेतीवर इतर खर्चही करणे अशक्य आहे. त्यांच्याकडे बैलजोडी नाही, मजुरांसाठी पैसे नाहीत त्यामुळे त्यांची पत्नी आणि ते मिळून निंदण, खुरपण, डवरणी ही कामे स्वत:च करून आपले उदरभरण करतात. आजच्या युवा पिढीसाठी हा एक आदर्श आहे. या वृद्ध दाम्पत्याच्या वयाला हरवून संकटावर मात करण्याच्या धाडसाने इतर शेतकऱ्यांना ऊर्जा मिळत आहे. अलिकडच्या काळात युवा शेतकरी नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानापोटी नैराश्य पत्करून आत्महत्या करीत असताना वाशिम तालुक्यातील तांदळी शेवई येथील वृद्ध दाम्पत्य जिवनाच्या अखेरच्या वळणावर आधुनिक साहित्य, बैल जोडी नसतानाही एकमेकांच्या साथीने त्यांची शेती कसत आहेत .