वाशिम - कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहे. त्यामुळे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या लसीकरणाकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी लसीकरण झालेल्या नागरिकांना सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यातील रिसोडच्या बेंदरवाडी भागातील एका 70 वर्षाच्या आजींची गेल्या 9 वर्षापासून गेलेली दृष्टी लस घेतल्यानंतर आली आहे. लसीकरणामुळे आजीची दृष्टी परतल्याने कुटूंबात आनंद व्यक्त करण्यात करण्यात येत आहे.
कोण आहेत आजीबाई?
रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवे या 70 वर्षाच्या आजीचे आयुष्य गेल्या 9 वर्षांपासून अंधारामय होते. कारण दहा वर्षापूर्वी मोतीबिंदूचा परिणाम झाला आणि दोन्ही डोळ्यांनी दिसणे बंद झाले. मथुराबाई या मूळच्या जालना जिल्ह्यातील परतूरच्या आहेत. मात्र त्यांना 9 वर्षापूर्वी अंधत्व आले आणि त्यांच्या जीवन कायम अंधारमय झाले. घरी मुलं बाळ नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना आधार देण्यासाठी रिसोड येथे आणले. यादरम्यान या आजीने 26 जूनला रिसोड येथील समता फाउंडेशनकडून सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड या लसीचा पहिला डोस घेतला. काही दिवसातच या आजीला दोन्ही डोळ्यांनी दिसू लागले. या आजीला इतक्या वर्षांनंतर दिसू लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
'हे' आहेत डॉक्टरांचे मत
या संपूर्ण प्रकारावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले, की कोरोना लस घेतल्यानंतर त्या आजीबाईची दृष्टी परत आल्याचे बोलल्या जात आहे. मात्र असा प्रकार अद्यापही शास्त्रीयदृष्ट्या पुढे आला नाही. त्यामुळे याप्रकाराची पूर्ण चौकशी केल्यानंतरच वास्तविक परिस्थितीवर भाष्य करता येणे शक्य आहे. मात्र लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.
हेही वाचा -मुक्त विद्यापीठ ते लंडन : 45 लाखांची स्कॉलरशिप मिळवणारा शेतकरी पुत्र; वाचा, राजू केंद्रेचा प्रवास...