वाशिम - जिल्ह्यात रविवारी 28 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 245 वर पोहोचली आहे.
रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये रिसोड तालुक्यातील 14, मंगरूळपीर तालुक्यातील 6, वाशिम तालुक्यातील 1, शहरातील सुंदरवाटिका परिसरातील एकाच कुटुंबातील 4, कारंजा लाड तालुक्यातील रामनगर येथील 1 आणि कामरगाव येथील 2 व्यक्तींचा समावेश आहे.
रिसोड येथे आढळलेल्या बाधितांमध्ये इंदिरा नगर परिसरातील 12 व्यक्ती, सदाशिव नगर परिसरातील 1, आंचळ येथील 1 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगरूळपीर येथे आढळलेल्या बाधितांमध्ये मंगलधाम परिसरातील 1, बढाईपुरा परिसरातील 1, दर्गा चौक परिसर 1, हुडको कॉलनी परिसरातील 1 आणि चिखली येथील 2 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण जिल्ह्यातील यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत.
आतापर्यंत 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 105 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 134 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
हेही वाचा - कोरोनाचा कहर..! देशात 24 तासांत 28 हजारांहून अधिक नवे कोरोनाग्रस्त
वाशिम शहरातील बागवानपुरा परिसरातील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीला ‘सारी’ आजाराची लक्षणे असल्याने त्याच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान, 7 जुलैला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम शहरातील कुंभारपुरा येथील 69 वर्षीय व्यक्तीचा 11 जुलैला औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीला हृदयरोग असल्याने त्याची यापूर्वीच शस्त्रक्रिया होऊन ‘पेसमेकर’ उपकरण बसविण्यात आले होते. यामुळे ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हृदयरोगविषयक उपचार करणाऱ्या औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 11 जुलैला त्यांचा मृत्यू झाला.