वर्धा - आर्वी येथील नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदनही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. या निवेदनात नगर परिषदेच्या कामकाजावरून मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहे.
आर्वी नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. कारण याठिकाणी सर्व २३ नगरसेवक हे भाजपचेच आहेत. एकाच पक्षाचे नगरसेवक असणारी ही कदाचित महाराष्ट्रातील एकमेव नगर परिषद असावी. याठिकाणी एकही विरोधक नसल्याने येथील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
या नगर परिषदेत ८ महिन्यांपूर्वी विद्याधर अंधारे हे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. तेव्हापासून अनेक विभागांतील कामात नियमानुसार न करता बगल दिले जात आहे. यात एलईडी लाईट लावण्याचा कंत्राट असो, की बाजार ओटे. त्याचे लोकार्पण होण्यापूर्वीच तडा गेल्याने कामाचा दर्जा कसा असेल हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जलतरण प्रकल्प आणि क्लब हाऊस प्रकल्पात एक कोटींच्यावर टेंडर आहे. हे बांधकाम विभागाकडे न देता नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. यात नगर परिषदेने टेंडर काढून अनुभवहीन कंत्राटदाराला काम दिल्याचा आरोप दिलीप पोटफोडे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
यासह आर्वी नगर परिषदेच्या इतरही कामाच्या पद्धतीवर यावेळी आक्षेप घेण्यात आला. तसेच नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्यावरसुद्धा चुकीच्या कामांना पाठीशी घालत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी नसल्याने नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले.
नगर परिषदेच्यावतीने सुरू असलेले काम हे नियमानुसार केले जात आहे. यात काही चुकीचे झाले असतील तर त्याची चौकशी होईल. त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. तसेच यावर योग्य उत्तर दिले जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी दिली.