वर्धा - सेवाग्राम येथे रात्री महिलेला विद्युत तारेला धडकून पडलेले लांडोर दिसले. त्या महिलेने त्या लांडोरला पकडले. यावेळी परिसरातील कुत्रे महिलेचा पाठलाग करत होते. मात्र, त्या महिलेने लांडोरला जीवनदान दिले. यामुळे या महिलेचे कौतुक होत आहे. जखमी लांडोरवर पिपल फॉर अॅनिमल्स पिपरी येथील करुणाश्रमात उपार सुरू आहेत.
सेवाग्रामच्या जुनी वस्तीत लांडोर जखमी अवस्थेत आढळून आला. गावातील दारूबंदी पथकाच्या गीता कुंभारे यांना तो दिसला. जखमी असल्याने लांडोर पळत सुटला. लांडोर धावत असतांना त्याच्या मागे कुत्रे लागले. यामुळे कुत्रे लांडोरला खाऊन टाकतील, असे त्यांना वाटले. यावेळी कुत्र्यांना हाकलून लावत काही गावातील युवकांच्या मदतीने त्यानी लांडोरला पकडून जीवनदान दिले. जखमी असल्याने त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, घाबरलेला लांडोर काही प्रतिसाद देत नव्हता. यामुळे याची माहिती गीता कुंभरे यांनी सेवाग्राम पोलिसांना दिली.
गीता कुंभरे यांनी पक्षाला घेऊन सेवाग्राम पोलिस ठाणे गाठले. यावेळी सेवाग्राम पोलिस ठाण्यात कार्यरत आयुब खान यांनी लांडोर पक्षी जखमी अवस्थेत असल्याची माहिती पीपल फॉर अॅनिमल्सचे आशिष गोस्वामी यांना दिली. त्यानंतर पीपल फॉर अॅनिमल्सचे रोहित कंगाले, व्यंकटेश जकाते व कौस्तुभ गावंडे यांनी घटनास्थळी पोहोचून लांडोर पक्ष्याची पाहणी केली.
या वेळी लांडोर पक्ष्याचे पाय व पंख जखमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लांडोर आपल्या ताब्यात घेत पुढील उपचाराकरिता करुणाश्रमात आणले. सेवाग्राम येथे दारूबंदी करता कार्य करत असलेल्या या महिलेने वन्य पक्ष्यांबाबत दाखवलेले औदार्य आणि आपुलकीने लांडोर पक्षाला जीवनदान मिळाले. अन्यथा कुत्र्यांच्या हल्यात लांडोरचा मृत्यू झाला असता. यामुळें आशा सतर्कतेची गरज असल्याचे पीपल फॉर अॅनिमल्सचे कस्तुभ गावंडे यांनी ईटीव्ही भारताला सांगितले.
लांडोर पक्ष्याची माहिती -
मोराचा समावेश पक्षिवर्गाच्या गॅलिफॉर्मिस गणाच्या फॅजिॲनिडी कुलात होतो. तो मूळचा दक्षिण आशियातील असून जगात अनेक ठिकाणी त्याचा प्रसार झालेला आहे. या पक्षाच्या नराला मोर तर मादीला लांडोर म्हणतात. भारतात आढळणाऱ्या लांडोरीची लांबी सु. ९५ सेंमी. आणि वजन २·७५–४ किग्रॅ. असते. लांडोरीला पिसारा नसतो. शेपटी दाट तपकिरी असून तिचा खालचा भाग तकतकीत हिरवा असतो. पाय बळकट असून त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बोटावर तीक्ष्ण शुंडिका (स्पर) असते. दोन मोरांमध्ये भांडण झाले की या शुंडिकेच्या साहाय्याने ते एकमेकांवर हल्ला करतात. लांडोरीचे डोके बिरंजी रंगाचे असून तिच्याही डोक्यावर नराप्रमाणे तुरा असतो.