वर्धा - अनेक दिवसांच्या दडीनंतर जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. मध्यरात्रीपासून जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून शेतकरी सुखावले आहे. मागील २४ तासात २६.५४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत यंदा २१२.३० मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जुलै महिन्यात ३३७.५१ मिमी पाऊस झाला. जो सरासरीच्या ३६.६६ टक्के अपेक्षित आहे. मात्र, आजपर्यंत २१२.३० मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. सध्या पूर्णतः ढगाळ वातावरण असल्याने आणखी पाऊस अपेक्षित आहे. मागील ३ दिवसात झालेल्या पावसाने जिल्ह्याच्या धरणसाठ्यात ४ टक्क्याने वाढ झाली असून सध्या १४ टक्के धरणसाठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात मंगळवार सकाळपर्यंत सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात ३७.३ मिमी नोंद झाली आहे. देवळी तालुक्यात ३६.१५ मिमी, समुद्रपूर ३५.८६, आर्वी तालुक्यात २८.९१ मिमी, आष्टी २४.६६ मिमी, तर वर्ध्यात २०.८१ मिमी, कारंजा १९.०८ मिली पावसाची नोंद असून सेलू इथे सर्वात कमी ९.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजची एकूण सरासरी २६.५४ मिमी नोंदवण्यात आली आहे.
पावसाची सरासरी भरून निघण्यास जोरदार पावसाची गरज आहे. यंदा धरणसाठा पूर्णतः संपून केवळ मृत साठा शिल्लक राहिला होता. यामुळे पिकांना जरी नवसंजीवनी मिळाली असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. यामुळे आणखी भरभरून पाऊस बरसावा, अशी अपेक्षा केली जात आहे.