वर्धा - दुकानाचे शटर तोडून चोरी करणारी टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. तब्बल 10 दिवस मध्यप्रदेशात शोधमोहीमेनंतर आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. वर्धा येथील स्थानिक मालगुजारी पुरा आणि गोलबाजार परिसरातील दुकानाचे शटर तोडत 3 लाख 30 हजाराचा मुद्देमाल घेऊन ही टोळी पसार झाली होती. यामध्ये सोने - चांदीच्या दुकानाचाही समावेश आहे.
दत्तमंदिर चौकातील दिनेश कारंडे नामक व्यक्तीचे सोने चांदीचे दुकान फोडून यामध्ये 1 लाख 92 हजाराची आभूषण घेऊन चोरटे पसार झाले. दुसऱ्या दिवशीदेखील त्यांनी गोलबाजार चौकातील आबीद हकीमुद्दीन ईसाजी यांच्या दुकानातील 1 लाख 40 हजाराचा माल चोरी केला होता. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील एका पारधी बेड्यावर काही चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले होते. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांनी पीएसआय आशिष मोरखेडे यांच्या चमुला मध्यप्रदेश येथे पाठवले. यात इंदोरच्या देपालपूरच्या बजरंगपुरा भागातील हे आरोपी असल्याचे माहिती पथकाच्या हाती लागली.
हेही वाचा -वर्ध्यात चार लाखांची अवैध विदेशी दारू जप्त..., शिमग्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई
यामध्ये अपालसिंग धरमसिंग सोळंकी(30), धरमसिंग हजयसिंग सोळंकी (55), उमराव गुज्जर(25) अशी आरोपींचे नाव आहे. या तिघांकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशाप्रमाणे पीएसआय आशिष मोरखडे, पोलीस कर्मचारी सलाम कुरेशी, गजानन लामसे, स्वप्नील भारद्वाज, मनिष श्रीवास, यंशवत गोल्हर, अभिजीत वाघमारे, मनिष कांबळे यांनी ही कारवाई पार पाडली.
हेही वाचा -वर्ध्यातून दोन पाहाडी पोपट जप्त, वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल