नागपूर - हिंगणघाटमध्ये एका नराधमाने केलेल्या हल्ल्यात जळालेल्या शिक्षिकेची स्थिती अगदी गंभीर असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू आहेत. पुढील २-३ दिवस तिच्यासाठी फार महत्त्वाचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान आरोपी विकी नगराळे याला आज सकाळी दरम्यान नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करून न्याय प्रविष्ट करू, यात चार्टशीट दाखल करत, हे प्रकरण फास्ट ट्रक न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची मोबाईल लोकेशन 11 वाजताच्या सुमारास टाकळघाट येथील येत होते. नागपूरच्या बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस तिथे गेले असता, आरोपी विकी नगराळे हा विक्तु बाबा मंदिर जवळ एका शेतात बाईक वर घाबरलेल्या अवस्थतेत बसला होता.पोलिसांनी पकडल्यानंतर आपण काहीच केले नाही असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. बुटीबोरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हिंगनघाट पोलिसांच्या स्वाधीन केले आहे
या हल्ल्यामध्ये पीडिता सुमारे ३५ टक्के भाजली आहे. यामध्ये तिचा चेहरा, डोळे आणि मान गंभीररित्या भाजले गेले आहेत. पीडितेची वाचा गेली आहे, तसेच पुढे कदाचित तिची दृष्टीही जाऊ शकते, अशी शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत. पीडित तरुणी वर्ध्यातील हिंगणघाटपासून १० किमी अंतरावर असलेल्या एका गावात राहते. ती दररोज हिंगणघाट येथे एका खासगी महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ती महाविद्यालयात जात असताना नांदोरी चौकात तिच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटता टेंबा फेकण्यात आला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.
आरोपी आणि तरुणी आणि एकाच गावातील आहेत. यात आरोपी तरुण हा विवाहीत असून या घटनेतील तरुणीशी काय संबंध आहे? याचाही शोध पोलीस घेत आहेत. यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : धक्कादायक..! वर्ध्यात तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न