वर्धा - राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व विभागाच्या स्वतंत्र बैठका घेत जिल्ह्याच्या कारभार समजून घेतला. यावेळी सर्व विभागाच्या प्रमुखांना सूचना देत कार्यपद्धतीची माहिती दिली. सोबतच चालू वर्षातील नवीन कामांचे प्रस्ताव देण्यासाठी 21 जुलै चा अल्टीमेटम दिला. ज्यांच्याकडून प्रस्ताव येणार नाही त्याच्यावर मंत्रालयीन स्तरावर कारवाइचे संकेत दिले. जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी अन्न सुरक्षा योजना, धान्य वितरण योजना, उज्वला गॅस योजना, संजय गांधी योजना, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी वाटप, क्षेत्रीय अधिकारी यांच्या गावभेटी, कामगार कल्याण योजनेचे लाभार्थी नोंदणी शिबिर लावणे, व्यक्तीगत लाभ येाजना, तलाठी-ग्रामसेवक-कृषीसहायक यांच्या मार्फत राबविण्यात येणारा गाव निहाय कार्यक्रम आखणे, 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक येाजना यांसारख्या अनेक योजनांचा आढावा घेतला.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या काही सुचना -
- सरकारच्या कामात मदत न करणाऱ्या बँकांची यादी तयार करून, त्या बँकेतील शासकीय खाते बंद करावे.
- बँकांनी शासकीय धोरणांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करावे.
- जिल्ह्यात कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतर कामाचे व्हिडीओ सर्व विभागप्रमुखांनी सादर करावे त्यानंतरच संबंधित कंत्राटदाराचे पैसे देण्यात यावे.
- बिडीओ, तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांचा एक गट तयार करून, गावगावात जाऊन गावकाऱ्यांसोबत साधावा. सरकारी योजना पोहचल्या आहेत की नाही याचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा. त्या बैठकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी.
- दुष्काळ पाहून कमी पावसातील पिकांचे नियोजन करावे, दुष्काळासाठी सूक्ष्म पातळीवर नियोजन करत एक थेंबही पाणी वाया न जाता जमिनीत मुरवण्याचे नियोजन करावे. कृषी विभागाने यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
- पीक विम्याबाबत अनेक तक्रारी असून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. लीड बँक आणि जिल्हा निबंधक यांनी कर्जमाफीत नाव असूनही कर्जमाफी न मिळलेल्या शेतकऱ्यांना पत्र पाठवून कळवावे.
- सरकारच्या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात या बैठकीला खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, अमर काळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्यकार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, अपर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, राजेश बकाने यांची उपस्थिती होती.