वर्धा- तळेगाव टालाटुले येथे भाजपच्या वतीने अर्धनग्न जलसमाधी आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच, सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपच्या वतीने तळेगाव टालाटुले गावातून मोर्चा काढत तलावात उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी अर्धनग्न जलसमाधी घेत विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या. विदर्भातील काही भागात अतिवृष्टीसह, तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक जवळ-जवळ ९५ टक्के खराब झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. अशातच कपाशीच्या पिकांवर बोंड अळीचे आक्रमणही झाले. त्यानंतर जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये विदर्भाला सापत्न वागणूक देण्याचे काम माहाविकास आघाडी सरकारने केले आहे.
हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी..
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ओला दुष्काळ जाहीर करत मदत करण्यात आली. यामुळे, विदर्भातील शेतकऱ्यांना सोयाबीन नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी भाजपचे महामंत्री मिलिंद भेंडे यांनी केली. भाजपचे माजी जिल्हापरिषद सभापती तथा भाजप महामंत्री मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वर्धा पंचायत समिती सभापती महेश आगे, भाजप युवा मोर्च्यांचे अध्यक्ष वरूण पाठक यांच्यासह अतुल तिमांडे, सरपंच कृष्णा गुजरकर, भास्कर वरभे, गणेश वांदाळे, अविनाश बाभूळकर आदींनी जलसमाधी आंदोलनात सहभाग घेतला होता.
हेही वाचा- प्रकल्पग्रस्त आणि पट्टेधारकांचे प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना