वर्धा - हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे दोन वृक्षप्रेमी युवकांनी गावात आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. विवाहस्थळी गावातून निघताना नवरदेवाने वृक्ष लागवड करण्याची नवी पद्धत सुरुवात करण्यात आली आहे. नवरदेव स्वतःच्या हाताने वृक्षारोपण करतो. यातून वृक्षसंगोपनाचा संदेश देतो.
अल्लीपूर येथील निलेश धोंगळे आणि आकाश पडोळे हे तरुण गावात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संदेश देत आहेत. मागील काही दिवसंपासून त्यांनी नवनवे उपक्रम राबवले आहेत. यातील एक म्हणजे वृक्ष लागवडीचा संदेश. नव्या नवरदेवाने लग्नाला जाण्याआधी वृक्षलागवड करावी, अशी कल्पना त्यांनी मांडली. या कल्पनेचे गावातून स्वागत होत आहे.
सुनील पोटदुखे यांचा विवाह असल्याने आज सकाळी वऱ्हाडी मंडळी दारात पोचताच आकाश आणि निलेश एक झाड घेऊन पोहचले. सुनिलच्या अंगणातच हे झाड सुनिलच्या हाताने खड्डा करून लावून घेतले. या झाडाचे नवीन आयुष्यासोबत संगोपन करण्याचे वचन घेण्यात आले. तसेच, नवीन आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
सुनीलनेही आगळी वेगळी भेट समजून निलेश आणि आकाशच्या उपक्रमाचे कौतुक केले. गावात या उपक्रमाची आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. यातून गावकऱ्यांना सुद्धा वृक्ष लागवड आणि संवर्धनाची प्रेरणा मिळू लागल्याने युवकांचे कौतुकच होत आहे.