वर्धा - लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी वीस दिवस अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. वर्धा लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यात पार पडली. काँग्रेसकडून चारुलता टोकस, भाजपकडून रामदास तडस, वंचित बहुजन आघाडीकडून धनराज वंजारी हे उमेदवार रिंगणात होते. मतदान झाले असले, तरी जनतेचा कौल कुणाला मिळणार याबद्दल उमेदवारांसह नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
वर्धा लोकसभा निवडणूक ही पहिल्या टप्प्यात पार पडली. स्वाभाविक पहिल्या टप्प्यात लोकसभेची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना तयारीसाठी वेळ कमीच मिळाला. पण वाढलेले तापमान पाहता विदर्भवासीयांना फायद्याचेच ठरले असे दिसून येत आहे. वर्धा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस, तर काँग्रेसच्या वतीने महिला काँग्रेस प्रदेश प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस उमेदवार होत्या. ऐनवेळी काँग्रेसचे तिकीट नाकारल्यामुळे शैलेश अग्रवाल बसपकडून निवडणूक लढले. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धनराज वंजारींना उमेदवारी जाहीर झाली.
चारही उमेदवारांमध्ये चुरस असल्याचे बोलले जात आहे. या उमेदवारांसह इतर अपक्ष १२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीच्या काळात प्रत्येकानेच आपापल्या परीने मतदार राजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात हे उमेदवार कितपत यशस्वी झाले, हे निकालात स्पष्ट होईलच. मात्र मतदारांनी निकालापूर्वी चुप्पी साधल्याने अंदाजांचे गणित जुळवायला कठीण जात आहे.
उमेदवारांचा हल्ली मुक्काम कुठे?
भाजपचे रामदास तडस काही दिवस पक्षाने सोपवलेली जवाबदारी म्हणून कोलकत्यासह काही भागात प्रचारात सामील झाले. आता पुन्हा लोकांच्या गाठी भेटी घेणे, तसेच दुष्काळ असल्याने श्रमदानात सहभागी होऊन लोकांचा उत्साह वाढविणे या कामात व्यग्र आहेत. दैनंदिन कामे पुन्हा सुरू झाली असून, पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्न सूरु असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास तडस यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या चारूलता टोकस सध्या इतर राज्यातील निवडणुक प्रचारात सहभागी होत आहेत. मध्यप्रदेश, दिल्ली या भागात प्रचार करण्यासाठी गेले असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. बसपाकडून उमेदवारी मिळालेले शैलेश अग्रवाल यांना निकालाची प्रतीक्षा आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी हे सुद्धा पक्षाने दिलेल्या प्रचाराच्या जबाबदारीत बाहेर असल्याचे सांगण्यात आले.
शेवटी प्रतीक्षा आहे ती २३ मे ची. या दिवशी येणाऱ्या निकालाची. चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, हे सांगायला मतदानाची टक्केवारी आणि मतांचे विभाजन हे महत्वाचे ठरणार आहे. एक विजयी होईल आणि तो मतदारांनी बहुमतांनी निवडलेला असेल. पण, हा विजयी उमेदवार कोण असेल याची उत्सुकता सर्व नागरिकांना लागली आहे.