वर्धा - एरवी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने वाहन थांबवून दादागिरी केली, पैसे मागितले, गाडीची चावी काढली असे व्हिडिओ व्हायरल झालेले दिसतात. यावर कारवाईसुद्धा झालेली पाहायला मिळते. परंतु, वर्ध्यातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा अंधारात काढलेला व्हिडिओ कौतुकास पात्र ठरत आहे. एका वयोवृद्धाला अंधार असल्याने हात धरून रस्ता पार करून दिल्याचा हा व्हिडिओ आहे. यामुळे शिव्या घातल्या जाणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
वर्ध्यातील बजाज चौकातील हा व्हिडिओ असून या भागात अनेक वर्षांपासून एकच पूल असल्याने तेथे वाहनांची गर्दी पाहायला मिळते. एरवी याठिकाणी हायमास्ट असल्याने प्रकाशमयसुद्धा असते. पण हा व्हिडिओ लाईट गेली असतानाचा असल्याचे दिसून येत आहे.
गजबजलेल्या चौकात लाईट गेली असताना वयोवृद्धाला रस्ता ओलांडण्यास अडचण होत आहे. हे लक्षात येताच वाहतूक कर्मचारी दिनकर फुलजोगे हे मदतीला धावून गेले. वाहनांच्या गर्दीत अंधार असल्याने त्यांचा हात धरून त्यांनी वयोवृद्धाला रस्ता ओलांडून दिले, असे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
ही बाब अनेकांनी आपल्या डोळ्यांनी बघितली. तर काहींनी मोबाईलमध्ये कैद केली. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची माणुसकी अंधारात असली तरी वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशात व्हिडिओ घेणाऱ्यामुळे कैद झाली. या व्हिडिओमुळे दिनकर फुलजोगे यांच्यासारखे माणुसकी जपणारे वाहतूक पोलीससुद्धा आहेत हे सिद्ध झाले आहे. दरम्यान, सध्या त्यांच्या या कामगिरीचे कौतूक होताना दिसून येत आहे.