वर्धा- जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला धान्य पावसात भिजले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे बाजारात सुरू असलेल्या मालाच्या खरेदी विक्रीत अडथळा निर्माण झाला होता. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा माल घरात पडून राहिला. पैशाची चणचण पाहता शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आले. यामध्ये मंगळवारची धान्याची आवक ही ३ हजार क्विंंटलच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. यात सोयाबीन, तूर, गहू आणि चण्याचा समावेश होता. मात्र, काल अचानक आलेल्या पावसाने लिलावासाठी आलेले धान्य भिजले. यामुळे भाव पडून मालाचा लिलाव होणार असल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान, बाजार समितीच्या आवारात वातावरण चांगलेच तापले असताना वर्धा पंचायत समितीचे सभापती श्याम कार्लेकर आणि काही संचालक मंडळी यांनी व्यापाऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीने काल झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसीचा सेज सोडून मालाची देवाण घेवाण केली. तेच व्यापाऱ्यांकडून मिळणारी अडत घटवत अर्धी अडत घेतल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याचे नियोजन केल्याचे सभापती श्याम कार्लेकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी मात्र व्यापाऱ्यांच्या मालाला शेड असून शेतकऱ्यांच्या मालाला उघड्यावर लिलाव होत असल्याचा आरोप केला आहे. तेच सभापती यांनी आवक जास्त असल्याचे कारन देत वेळ मारून दिल्याची चर्चा ऐकायला मिळाली.
हेही वाचा- स्थलांतरितांचे समुपदेशन; कुटुंबीयांपासून दुरावा नाही तर सुरक्षा, आरोग्य विभागाचा उपक्रम