वर्धा - जिल्ह्यातील पुलंगाव येथे नागपूर-मुंबई महामार्गावर दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली.या अपघातात दोन दुचाकीस्वार युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नागपूर-मुंबई महामार्गावरील पुलंगाव जवळील रिलायंस पेट्रोलपंपासमोर हा अपघात झाला आहे. दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की २ दुचाकीस्वार युवकांचा यात जागेवरच मृत्यू झाला. सुमित गुलहाने (२१) तर निहाल बोरकर (१९) अशी मृतांची नावे आहेत.
हे युवक अमरावती जिल्ह्यातील असून ते दुचाकीने देवळीला जात होते. दरम्यान, यावेळी ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामुळे दोघेही युवक दूरवर फेकल्या गेले. डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहाचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.