वर्धा - आर्वी आगाराचे चालक खूबगाव येथील वळणावरून बस काढत होते. यावेळी दुचाकीस्वार खाली पडले. त्यानंतर या दोन जणांनी एसटी बसचालकाला बसमधून बाहेर काढून मारहाण केली व चालकाचे कपडेही फाडले. या घटनेमुळं संतापलेल्या एसटी कर्मचार्यांनी आर्वी बसस्थानकात कामबंद आंदोलन सुरू केले. पराशर नेहारे असे बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर कर्मचार्यांनी हे आंदोलन मागे घेतले. हिरालाल भलावी, बाबूलाल भलावी असे अटक केलेल्या दुचारीस्वारांची नावे आहेत.
जिल्ह्यातील आर्वी आगाराची बस वाठोडा येथून आर्वीला परत जात होती. यावेळी समोरून येत असलेली दुचाकी पाहून चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. दरम्यान, दुचाकी घसरून दुचाकीस्वार खाली पडले. त्यामुळं संतापलेल्या दुचाकीस्वारांनी अरेरावी करत बसचालक पराशर नेहारे यांना मारहाण केली. चालक नेहारे यांनी बस आर्वीला आणल्यानंतर पोलीस स्टेशनपुढे लावून तक्रार दाखल केली.
चालकाला मारहाण झाल्याची माहिती कळताच आर्वी बसस्थानकात चालक, वाहकांनी अचानक कामबंद आंदोलन सुरू केले. मारहाण करणार्यांना अटक झाल्याशिवाय बस सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत हिरालाल भलावी, बाबूलाल भलावी या दोघांना अटक केली. त्यानंतरच एसटी कर्मचार्यांनी जवळपास दीड तास बंद पाळत नंतर बसेस सुरू केल्यात.