वर्धा - समुद्रपूर पोलीस ठाण्याअंतर्गत नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव शिवारात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून एक येत असलेल्या दोन मालवाहक वाहनांनी त्याला धडक दिली. या धडकेत वाहन चालक संभाजी सूर्यवंशी (रा.आदिलाबादचा) आणि श्रीरंग जाधव (रा.शेगाव) असे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास शेडेगाव फाट्यानजीक असलेल्या हरीयाणा धाब्याजवळ ही घटना घडली. भरधाव वेगात यात असलेल्या अज्ञात कंटेनरच्या चालकाने अचानक ब्रेक लावले. कंटेनरच्या मागून येणाऱ्या वाहनाचे चालक मंगेश जाधव यांचे वाहनवरून नियंत्रण सुटले. त्यामुळे समोरच्या कंटेनरला धडक बसली. मागून येणाऱ्या तिसऱ्या वाहनाच्या बाबतीतही हाच प्रकार घडला. या विचित्र अपघातात मागून येणाऱ्या दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले.
हेही वाचा - अवैध दारूसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त; समुद्रपूर पोलिसांची कारवाई
महामार्ग पोलीस चौकीला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने स्त्याच्या कडेला लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली.