वर्धा - कारंजा येथील पेट्रोल पंपाजवळ भरधाव कारने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरून जात असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावर रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रविण मानापुरे (रा. कारंजा) आणि त्याचा चुलत भाऊ रोशन बारई (रा. वर्धा) अशी मृतांची नावे आहेत.
विजय रामराव पेट्रोल पंपावर असलेल्या टोल नाक्यावर अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहे. ड्युटी संपल्यानंतर तो कारने (क्रमांक एम. एच ३२, वाय ३०३३) नागपूरवरून कारंजाकडे जात होता. त्याचवेळी पांडे पेट्रोलपंपाजवळ असलेल्या कटवरून दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी जात होते. याच वेळी कार आणि दुचाकीस्वाराची जोरात धडक झाली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेवढ्यात कारचालक आणि त्याच्या साथीदाराने कार सोडून घटनास्थळावरून पळ काढला, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे नाकेबंदी करूनसुद्धा रात्रभर कार चालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नव्हते. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारचालकाचा शोध घेत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ठरतोय 'ब्लॅक स्पॉट'
राष्ट्रीय महामार्गावर वाहने अत्यंत वेगाने चालविली जातात. यामुळे पांडे पेट्रोलपंपवर सायंकाळी जाताना जीव मुठीतच घेऊन जावे लागते. कारण भरधाव वाहन केंव्हा येईल आणि केव्हा चिरडून जाईल याचा काही नेम नाही. यापूर्वी झालेल्या अपघातांत मागील ३ महिन्यात ३ ते ४ जणांनी आपला जीव गमावाला आहे. यामुळे यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.