वर्धा - जिल्ह्यातील आष्टी येथील एक तरुणी आणि आर्वी तालुक्यातील रोहणा येथील एक व्यक्तीला आज(मंगळवार) कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. हे दोघेही मुंबईतून आले असताना प्रकृती बिघडली असल्याने त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आता ते ठणठणीत बरे झाले असून कुठलीही कोरोनाबाधित लक्षणे नसल्याने त्यांना नवीन निर्देशानुसार सुट्टी देण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील अनेक नागरिक मुंबई, पुणे येथे नोकरी किंवा शिक्षणासाठी गेले होते. कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले होते. परंतु, प्रशासनाने परतीची परवानगी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर ते परत आले. यापैकी 6 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे तपासणीनंतर पुढे आले होते. यातील मुंबई येथून आष्टीमध्ये आलेल्या मुलीवर सेवाग्राम रुग्णालयात तर मुंबईतूनच रोहणा येथे आलेल्या युवकावर सावंगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोघेही आता ठणठणीत बरे झाले असून आज दोघांनाही सुट्टी देण्यात आली आहे. यानंतर, खबरदारी म्हणून पुढील 14 दिवस त्यांना कुटुंबियांसोबत गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील आता उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्ण संख्या 4 आहे. तर जिल्ह्यातील एक रुग्ण सिकंदराबाद येथे उपचार घेत आहे.
तर, उर्वरित 4 रुग्णांवर सेवाग्राम आणि सावंगी रुगणालायत उपचार सुरू आहे. तेच वर्ध्यातून सिकंदाराद येथे उपचारासाठी गेलेल्या एक व्यक्तीवरही तेथे उपचार सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण कोरोनापासून मुक्त होत आहेत. त्यामुळे, प्रशासनासह नागरिकांसाठीही वार्ता समाधान देणारी ठरत आहे.