वर्धा - यंदाच्या जून व जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणचे तलाव, नदी, नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच सर्व परिसर हिरवागार झालेला आहे. यामुळे अनेकांची पावले निसर्गरम्य ठिकाणी वळू लागली आहेत. त्यात सोशल मीडियावर सेल्फी शेअर करण्याची, तरुणाईची जणू क्रेझच बनली आहे. परंतु तलाव परिसरात अतिउत्साहात सेल्फी काढण्याचा मोह मित्रांना जीवावर बेतला आहे.
कारंजा तालुक्यातील उमरी येथील 5 जण धावसा (हेटी) येथील मित्राला घेऊन तलाव परिसरात फिरायला गेले होते. पावसामुळे तलाव परिसर हिरवागार झालेला आहे. हा निसर्गरम्य पाहून मित्रांसोबत सेल्फी काढायचा मोह त्यांना आवरला नाही. तलावाच्या काठावर उभे राहून सेल्फी घेत असताना दोघांना जलसमाधी मिळाली. तर तिघे बचावले. ही घटना रविवारी (ता. पाच) दुपारच्या सुमारास घडली. तेजस राजू चोपडे (वय 15) आणि हर्षल संजय चौधरी, दोघेही रा. उमरी अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेल्फी काढण्यासाठी खास उमरी येथून 6 मित्र धावसा (हेटी) येथील तलावावर आले. काही काळ ते तलावाच्या आजूबाजूला फिरले आणि फोटोसेशन केले. परंतु सेल्फी काढताना संपूर्ण तलाव मागे दिसावा, असा काही मित्रांचा आग्रह होता. सेल्फीच्या नादात, तलावाच्या काठावर असलेल्या पाणीपुरवठा विहिरीच्या बाजूला खोल खड्डयाजवळ सेल्फी काढत असताना एकाचा पाय घसरला. यावेळी उपस्थित चौघांनी एकमेकांचे हात धरून साखळी करून वाचवायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पाचही तलावात पडले. तेव्हा सहावा मित्र हर्षल धनराज कालभुत जो वरच्या भागात उभा होता. त्याने मोठ्या हिमतीने पाय देऊन एका मागून एक असे तिघांना वाचवले. पण या दरम्यान, तेजस चोपडे आणि हर्षल चौधरी हे बुडाले.
घटना कळताच गावकऱ्यांनी तलाव परिसरात मोठी गर्दी केली. यावेळी कारंजा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहोडूळेसह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यावेळी बुडालेल्या युवकांचे मृतदेह आशिष कोटजावरे, रोशन कुंभरे, मारोती मेश्राम, उत्तम कोटजावरे, सतीश पंचांभाई यांनी पाण्यात उतरून बाहेर काढले. पोलिसांनी त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. दरम्यान, या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.