वर्धा - हिंगणघाट मार्गावरील गोलहर धाब्यावर ट्रकच्या केबिनमध्ये झोपलेल्या ट्रकचालकाचा अज्ञात चोरट्याने चाकूचे वार करून खून केला. रमेश कुमार नरसिंग यादव ( वय 26 राहणार उत्तर प्रदेश ) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. चोरी करताना चालक रमेशकुमारला जाग आल्यानंतर झालेल्या झटापटीत चोरट्याने त्याच्यावर हल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वर्धा-हिंगणघाट मार्गावर धोत्रा चौरस्त्यावर गोलहर यांचा धाबा आहे. या धाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण करून अनेक ट्रकचालक विश्रांती घेतात. रमेश कुमार यादव हा शुक्रवारी वर्ध्यात सिमेंट भरलेला ट्रक रिकामा करून गडचांदूरला परत जात होता. दरम्यान गोलहर यांच्या धाब्यावर जेवण करून त्याने विश्रांती घेतली. मध्यरात्री गाढ झोपेत असताना एका चोरट्याने ट्रकच्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्याच्या खिशातील काही पैसे चोरी करण्याच्या बेतात असताना ट्रकचालक रमेश कुमार यादवला जाग आली. एवढ्यात त्याने विरोध केला असताना, चोरटा आणि चालक यांच्यात झटापट झाली. यात चोरट्याने रमेशकुमारच्या पोटावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार केले आणि पसार झाला. रमेशकुमारने कसाबसा लगतच्या दुसऱ्या ट्रकचालकाला उठवून हा प्रकार सांगितला. मात्र घाव गंभीर असल्याने रक्तस्राव अधिक होऊन त्याचा मृत्यू झाला.
यावेळी घटनास्थळावरील दुसऱ्या ट्रकचालकाने मदतीसाठी अॅम्ब्युलन्सला फोन केला. यावेळी फोनवरून माहिती देण्यात आली. पलीकडून मात्र अॅम्ब्युलन्स पाठवण्याऐवजी पोलिसांना फोन करा, असे उत्तर मिळाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. हा फोन नेमका कुठे केला, हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांकडूनसुद्धा याबाबत कुठलीही वाच्यता केली गेली नाही. मात्र योग्य वेळी अॅम्बुलन्स येऊन त्याच्यावर उपचार झाला असता, तर कदाचित रमेश यादव जिवंत असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
अल्लीपूर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रवीण डांगे यांनी पोलीस कर्मचार्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. अज्ञात चोरट्याच्या शोधात पथक रवाना झाले आहे. पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून याची माहिती देणाऱ्या चालकालाही विचारपूस करण्यात आली आहे. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.