वर्धा - वनक्षेत्र जास्त असणाऱ्या देशांमध्ये हॅपिनेस इंडेक्स अर्थात आनंदी असण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे आपल्या जर आनंदी जीवन जगायचे असेल वृक्षालागवडीत सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी येथे केले. ते 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जंगलापूर येथे वनमहोत्सव उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
लोकांच्या सहभागामुळे 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. काही वर्षांपूर्वी ग्लोबल वार्मिंग हा विषय केवळ चर्चा सत्राचा होता. पण आज ग्लोबल वार्मिंगमुळे प्रत्येक वर्षी आपण नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. यावर्षीही उन्हाळा तीव्र आणि दीर्घ स्वरूपाचा होता. त्यामुळे वनक्षेत्र जास्त असेल तर पाणी सुद्धा जास्त राहील. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने 10 झाडे तरी लावावीत, असेही ते म्हणाले. फिलिपाईन्स या देशामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 10 झाडे लावायला सक्तीचे आहे. त्यानंतरच त्यांना पदवी प्रमाणपत्र दिले जाते. आपल्याकडे सक्ती करण्याची गरज पडू नये. सक्ती पेक्षा स्वतःहून केलेले कोणतेही काम चांगले आणि कायमस्वरूपी होते. आजच्या ग्लोबल वार्मिंगला थोपवण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
![Wanmahotsava start in janglapur, wardha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-war-tree-pantation-pkg-7204321_01072019225253_0107f_1562001773_661.jpg)
पोलीस अधीक्षक बसवराज तेली म्हणाले की, पृथ्वीवर जगण्यासाठी पाणी आणि ऑक्सिजन या दोन बाबी आवश्यक आहेत. या दोन्ही बाबी झाडांमुळे निर्माण होतात. ही पृथ्वी पुढील पिढीसाठी जगण्यायोग्य राहावी यासाठी आतापासून आपण काळजी घेतली पाहिजे. आज भूजल पातळी 80 फुटावरून 600 फुटापर्यंत खाली गेली आहे. पुढच्या 30 वर्षात काय परिस्थिती होईल हे सांगता येत नाही. हे थांबवायचे असेल तर, प्रत्येकाने झाड लावून ते जगवावे असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यावेळी म्हणाले की, 87 लाखांपैकी 20 लाख वृक्ष लागवडीचा लक्ष्यांक जिल्हा परिषदेकडे आहे. लोकांचा सहभाग वाढविल्याशिवाय शासकीय योजना यशस्वी होत नाही. जलयुक्त शिवार, स्वछता अभियान यांसारख्या कार्यक्रमात शासनाने लोकसहभाग मिळविला आणि त्यानंतर त्या योजना यशस्वी झाल्या. वृक्ष लागवड सुद्धा आज लोकचळवळ झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वन विभागासोबतच वेगवेगळ्या 49 विभागांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांचाही या कार्यासाठी चांगला प्रतिसाद आहे. वनविभागाच्या वतीने यावर्षी सुद्धा जनतेसाठी 'रोपे आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात येत आहे. या ठिकाणी लोकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होतील, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
महाबळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुनिंब, बेहडा ,हिरडा या झाडांचे वृक्षारोपण करत या मोहिमेला हातभार लावला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे, तहसीलदार सोनवणे, नगराध्यक्ष शारदा माहुरे, पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, गटविकास अधिकारी श्रीमती कोल्हे, विभागीय वनाधिकारी डी एन जोशी, केळझरच्या सरपंच श्रीमती लोणकर, प्रा.वैभवी उघडे, मुरलीधर बेलखोडे, आशिष गोस्वामी सह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.