वर्धा - लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग अडकलेला होता. त्यांच्यासाठी वर्ध्यातून पहिली विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली. बिहारमधील एक हजार कामगारांना घेऊन ही विशेष श्रमिक ट्रेन वर्ध्यातून रवाना झाली. मात्र, या कामगारांना त्यांच्या घरी पाठवणे हा जणू राजकीय इव्हेंट असल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसचे कार्यकर्ते याठिकाणी झेंडे घेऊन आले होते. मात्र, पोलिसांनी थांबवल्याने नाईलाजास्तव त्यांना झेंडे घेऊन रेल्वे स्थानकातून परत जावे लागले.
कामगारांना पाटण्याला घेऊन जाणारी रेल्वे जरी वर्ध्यातून सुटली तरी यामध्ये चंद्रपूरमध्ये अडकलेल्या कामगारांचाही समावेश होता. 1 हजार 19 लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनला खासदार रामदास तडस, पालकमंत्री सुनील केदार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्तेही आले होते. काही कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडेही आणले होते. मात्र, पोलिसांनी फलाटावर जाऊ न दिल्याने कार्यकर्ते झेंडे घेऊन माघारी गेले. या कार्यकर्त्यांच्या गर्दीने सोशल डिस्टंन्सिंगची वाट लागली. पालकमंत्र्यांनीही नेहमी प्रमाणे दुपट्टा गुंडाळून मास्कची कमरतरता दूर करण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक संघटनाकडून शिदोरी -
स्वगावी जाणाऱ्या श्रमिकांना प्रवासाला बराच वेळ लागणार असल्याने काही सामाजिक संस्थांनी जेवणाचे पॅकेट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वितरण केले. मागील महिन्याभरापासून त्यांना मिळलेली आपुलकीची वागणूक आणि आत्ता मिळालेली शिदोरी त्यांच्यासाठी अधिक मोलाची असल्याची भावना काही कामगारांनी व्यक्त केली.
दरम्यान, पालकमंत्री हे रेड झोनमधील भागातून ग्रीन झोनमध्ये सहज जातात. कारण, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पण नियमांचे पालन ते करतात का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला असता चौकशी करू, असे उत्तर दिले जाते.