वर्धा- हिंगणघाट तालुक्यातील पोहणा जवळच्या बोपापूर येथे रात्रीच्या सुमारास ३ घरांच्या छतावर मासे आढळून आले. त्यानंतर माशांचा पाऊस झाल्याची अफवा उठली. यामुळे अभाअंनिसने गावात जाऊन पडताळणी करत असा प्रकार घडलाच नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
माशांचा पाऊस ज्यांच्या अंगणात आणि घराच्या छतावर पडला, त्या कुटुंबातील सदस्यांशी यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली. यातील कोणीही प्रत्यक्षात पाऊस पडताना पाहिला नाही. यासह तपासणीत मासे जिथे पडले होते तिथे एका ठिकाणी पळसाची पानेही पडलेली होती. गावातीलच अज्ञात व्यक्तीने खाण्यासाठी आणलेले हे लहान मासे खोडसाळपणाने अथवा दारूच्या नशेत पळसाच्या पानात गुंडाळून भिरकावले असल्याचे अंनिसच्या पडताळणीत स्पष्ट झाले. त्यातील एका कुटुंबातील प्रमुखाने मासे गोळा करून संशोधनासाठी अमरावती प्राणी शास्त्रज्ञ डॉ. गजानन वाघ यांच्याकडे पाठविल्याचे सांगितले.
समुद्रालगत चक्रीवादळादरम्यान अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. यालाच सामान्यतः माशांचा पाऊस पडला, असे संबोधले जाते. मात्र, बोपापुरात हे मासे पावसासोबत आलेले नाही. हा प्रकार मानवी हस्तक्षेपातूनच झाला आहे, हे खात्रीपूर्वक सांगता येईल, असे मत अभाअंनिसचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय इंगळे तिगांवर यांनी सांगितले.
बोपापूर प्रकरणात आढळलेले ते मासे गोड्या पाण्यातील असल्याचे प्राणी शास्त्रज्ञ डॉ. वाघ यांनी सांगितले आहे. या घटनेतील सत्यशोधनामुळे गावात वितुष्ट निर्माण होऊ नये याची दक्षता घेत अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना समुपदेशन केले. आता गावकरीच माशांचा पाऊस पडला, ही गोष्ट नाकारत आहेत. त्यामुळे, नागरिकांनीही अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे अभाअंनिसचे जिल्हा सचिव निलेश गुल्हाने यांनी सांगितले.
या संदर्भात अ.भा अंनिसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव निलेश गुल्हाणे, चेतन वाघमारे आणि हिंगणघाट तालुका संघटक मनोज गायधने यांनी वस्तुस्थिती जाणून घेत गावकऱ्यांच्या शंकेचे समाधान केले.
हेही वाचा- वर्धा: पत्नीकडून व्यसनाधीन पतीचा खून, शेतीच्या कारणावरून झाला होता वाद