वर्धा - मागील काही काळापासून सतत सुरू असलेला मतदार पुनरिक्षण कार्यक्रम हा शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अगोदरच शाळेच्या कामाचा व्याप असताना विद्यार्थ्याना शिकवणे सोडून हे काम करावे लागत असल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत. याच विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे दिले. 'आम्हाला शिकवू द्या हो' अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा - 'मुंबईसह महाराष्ट्राची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प'
राज्यभरातील शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिकवायचे असेल तर आम्हाला या कामातून मुक्त करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी केली.
हेही वाचा - करदात्यांना सरकारचा दिलासा; अशी आहे नवी 'करप्रणाली'
मागील अनेक वर्षांपासून राज्यातील प्राथमिक शिक्षकांना मतदान प्रक्रियेत केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाते. या प्रक्रियेत विविध १३ संवर्गातील कर्मचाऱ्यांना कामासाठी नियुक्त करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. असे असले तरी शिक्षकांनाच जिल्हास्तरीय निवडणूक विभागाच्या यंत्रणेने सर्वत्र मतदार पुनरिक्षणाच्या कार्यात नियुक्त केले आहे.