वर्धा - रोहितने आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्याची जास्त चर्चा झाली, मलाही हे अनपेक्षित होते. मी बारामतीला होते. आई म्हणून मला खूप बरं आणि समाधान वाटले. मुलामुळे आईची ओळख व्हावी, अशी प्रत्येक आईची इच्छा असते. रोहितने ते स्वप्न पूर्ण केले. रोहित मतदारसंघाच्या अपेक्षा पूर्ण करेलच, सोबत महाराष्ट्राबाबत चांगले निर्णय घेण्यात सहभागी होईल अशी इच्छा अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केली. वर्ध्याच्या बोरगाव (मेघे) येथील कस्तुरबा महिला बहुउद्देशिय संस्था आणि जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित दिवंगत प्रभा राव यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळावा आणि सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
हेही वाचा - #विज्ञान दिन : प्रयोगातून ज्ञानाकडे..! प्रात्यक्षिकातून विद्यार्थी मिळवतात प्रश्नांची उत्तरे
हिंगणघाटमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. महिला अत्याचाराच्या घटनांबाबत आरोपींवर लवकर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे. लवकर शिक्षा होण्यासाठी सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे, असे बोलून दाखवले. यावेळी सुनंदा पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, वैशाली गाडगीळ, विभा गुप्ता, हेमलता मेघे, आदी उपस्थित होत्या.
घरं मुकी झाली संवाद बंद झालाय -
संस्कारित पिढी महाराष्ट्राची गरज आहे. आज तरुण पिढीचा मोबाईल आणि टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे घरांमध्ये संवाद बंद झाला आहे. घरात गर्दी असते पण आवाज येत नसतो असे वातावरण पाहता घर मुकी झाली आहेत. आई-मुलींमध्ये संवाद घडला पाहिजे, असेही सुनंदा पवार म्हणाल्या.
हेही वाचा - तुळजापूर रेल्वे पादचारी पुलाची निर्मिती करा, खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी