वर्धा - स्वीडनच्या ग्रेटा थनबर्गच्या आंदोलनाला सेवाग्राम आश्रम परिसरातील आनंद निकेतन शाळेच्या मुलांनी हातभार लावला. सर्वजण पृथ्वीच्या तापमानवाढीचा निषेध करण्यासाठी सेवाग्राम आश्रमात बापूकुटीसमोर एकत्रित आली. तापमानवाढीमुळे होणाऱ्या दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी एक गाण्यातून आणि छोट्याश्या नाटकातून जागतिक प्रश्नांकडे लक्ष वेधले.
पावसावर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम; पावसाळ्याचे दिवसही घटले?
स्वीडन देशातील १६ वर्षाची मुलगी ग्रेटा थनबर्ग गेल्यावर्षी २० सप्टेंबरला शाळा बुडवून वाढत्या तापमानाबाबत लक्ष वेधून घेण्यासाठी स्वीडीश मंत्रालयासमोर निदर्शानांना सुरुवात केली होती. या आंदोलनात जगभरातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही तिने केले होते. गांधीजींचे शिक्षण, विचारांवर चालणाऱ्या आनंद निकेतन येथील शिक्षकांनी ग्रेटाच्या आंदोलनाला हातभार लावण्याचे काम सुरू केले आहे.
बापू कुटी समोरून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 'सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुरांचे, ओठावर झेलुया थेंब पावसाचे' या सृष्टीशी नाते सांगणाऱ्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर रॅली काढण्यात आली. कस्तुरबा विद्या मंदिर येथेही वाढती लोकसंख्या, निसर्गातील संतुलनावर होणारे मानवाचे आक्रमण हे जंगल, पाणी, माती यांना प्रदूषित व नष्ट करणारे मानवी वर्तन, त्यातून उद्भवलेले पूर, दुष्काळ, हवामानाचे वाढते लहरीपण, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या यासारखे गंभीर प्रश्नांकडे नाटकातून लक्ष वेधले. यावेळी त्यांनी तापमानवाढीबद्दल समाजावून सांगितले.
VIDEO : जवानाने वाचवला रेल्वे प्रवाशाचा जीव, मनमाड स्थानकावरील घटना
आम्ही जगण्यासाठीच्या संपात सहभागी आहोत. कारण आम्हाला पृथ्वी वाचवायची आहे, असे म्हणत निसर्गातील समतोल राखणारा प्रत्येक घटक आणि त्याचे महत्त्व या मुलांनी या छोट्याश्या नाटकातून सांगण्याचा प्रयत्न केला. हे नाटक वर्ध्यातील विविध शाळा महाविद्यालयामध्ये सादर करण्यात आले. यावेळी भरत महोदय, अशोक बंग, अनिल फरसोले, संजय सोनटक्के आदींनी अभिव्यक्त होत या प्रश्नाला शीघ्रतेने भिडण्याची गरज व्यक्त करीत आंदोलनाला पाठींबा दिला. या कार्यक्रमात कस्तुरबा विद्यालय, गांधी विचार परिषद व समाजकार्य विद्यालयाचे विद्यार्थी, पालक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.