वर्धा - औरंगाबादच्या नामकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबादचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाईंवर जोरदार टीका केली आहे. देसाई यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाचा सत्तेसाठी विसर पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेने सत्तेसाठी मैत्री तोडल्याचा आरोपीही त्यांनी केला आहे. ते वर्ध्याच्या देवळी येथे खासदार तडस स्टेडियमवर आयोजित शेतकरी संमेलनानंतर पत्रकारांशी बोलत होते.
पाच वर्ष भाजप, शिवसेनेचे सरकार होते. तेव्हा सुभाष देसाई मंत्री असताना राजीनामा खिशात घेऊन फिरायचे, तेव्हा राजीनामा का नाही दिला असा सवाल यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. ज्या कॉंग्रेस राष्ट्रवादीचा बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला त्याच्यांशीच शिवसेनेने सत्तेसाठी युती केल्याचंही ते म्हणाले आहेत. 27 नगरसेवक निवडून आले असताना बाळासाहेब ठाकरेंनी 1988 मध्ये नामकरणाची घोषणा केली होती. मात्र आता शिवसेनेला त्याचा विसर पडला आहे. मात्र तुम्ही पुढाकार घ्या आम्ही भाजप म्हणून तुमच्यासोबत आहोत असेही ते यावेळी म्हणाले.
बाळासाहेबांची इच्छा म्हणून तरी नाव बदला
औरंगजबाने अत्याचार केले. मग त्याचे नाव औरंगाबादला कशासाठी? सत्तेसाठी नाव बदलायचे नसेल तर नका बदलू, पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी तरी औरंगाबादचे नामकरण संभांजीनगर करा. भाजप आपल्या सोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुनगंटीवारांचा कॉंग्रेसला टोला
काँग्रेस म्हणते नाव बदलून विकास होत नाही, मग त्यांच्याकाळात त्यांनी पॉंडेचरीचे नाव पांडेचरी केले, बंगलोरचे नाव बंगळूरू केले, ओरिसाचे नाव ओडिसा केले. त्याने विकास झाला का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.