वर्धा - तहसीलदार, प्रांताधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱयांवर बऱयाचदा वाळू वाहून नेणाऱया ट्रक चालकाने हल्ले केलेले आहेत. त्यातच मंगळवारी (१६ जुलै) हिंगणघाट तालुक्याच्या धोची येथे वाळूचा ट्रक अडवल्याने गावातील एका व्यक्तीवर संबंधीत कामाची देखरेख करणाऱयाने चाकूने हल्ला केला. ज्ञानेश्वर इंगळे असे जखमीचे नाव असून वडनेर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
पूर्वी वाळूचे ट्रक गावाच्या बाहेरील रस्त्याने जात होते. आता मात्र, वाळूचे ट्रक गावातून जात असल्याने गावातील रस्ता खराब झाला आहे. असे गावामधून ट्रक नेण्यास मनाई करण्यास गेलेले गावचे माजी सरपंच आणि इतर गावकरी ट्रक चालकाला ट्रक बाहेरून नेण्यास सांगत होते. मात्र, यावेळी कंत्राट देखरेखीची जबाबदारी असणारे अमोल बुरांडे, अक्षय बुरांडे सहकाऱयांसह तिथे आले. गावकऱ्यांशी त्यांची बाचाबाची झाली आणि एकाने ज्ञानेश्वर इंगळे या गावकऱयावर धारधार शस्त्राने वार केला. आणि सर्व आरोपी पसार झाले. ज्ञानेश्वर इंगळे यांच्या उजव्या हाताची नस कापल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. आरोपी बुरांडे बंधूनी पळ काढल्याने गावकऱ्यांनी पुढील येरला गावात गाडी अडवण्यास सागीतले. यावेळी रस्त्यावर कल्टीव्हेटर आडवे लावून कार अ़डवली. पाठलाग करत आलेल्या गावकऱ्यांनी गाडीची तोड फोड केली. मात्र, बुरांडे आणि त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला.
जखमी ज्ञानेश्वरला तात्काळ वडनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक उपचारामध्ये सांगितले. जखमीला नागपूरला पाठवण्यात आले आहे. मात्र, प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहे.
गावात पोलिसांचा ताफा पोहचल्यावर गावकऱ्यांनी कारवाईची मागणी केली. या घटनेनंतर महसूल यंत्रणेला जाग आली. रात्री धोची घाटावरील दोन बोट जप्त केल्या आहेत. मात्र दोन्ही नायब तहसीलदार पोहचेपर्यंत काही मशीन गायब झाल्याचा गावकऱ्यांनी सांगितले. घाटावरील रस्त्याचे कंत्राट त्रिणीव्हा कंपनीला दिलेले आहे. वडनेर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजभिये करत आहे.