वर्धा - जिल्ह्यातील कारंजा शहरातील मस्के कुटुंबियांकडे महालक्ष्मीच्या मूर्ती (गौरी) अचानक रात्रीच्या सुमारास दरवाज्यात प्रकट झाल्याचे फोटो व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले होते. फोटोमुळे सर्वत्र चमत्कार घडल्याचे वृत्त पसरल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे दर्शनासाठी काहींनी गर्दी केली होती. या प्रकारामुळे समाजात अंधश्रद्धा पसरत असल्याची दखल अखिल भारतीय अंनिसच्या चमूने घेतली. यावेळी हा कुठलाही चमत्कार नसून यावर्षीपासून महालक्ष्मी (गौरी) स्थापना केल्याची माहिती लिखित स्वरूपात दिवाकर मस्के यांनी अखिल भारतीय अंनिसला दिली आहे.
चमत्कार झाल्याचे फोटो व्हायरल -
मागील दोन दिवसांपूर्वी कारंजा शहरातील दिवाकर मस्के यांच्या घरात महालक्ष्मी प्रकट होऊन चमत्कार घडल्याचे फोटो व्हायरल झाले होते. सोशल माध्यमामुळे दूरवरून माहिती पसरल्याने बाहेर गावतून लोक दर्शनासाठी येऊ लागले. यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरत असल्याने याबद्दल पद्धतीची खोटी चमत्कार घडल्याची माहितीचा प्रचार होत असल्याचे अभा अंनिसच्या लक्षात आले. कथित प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य युवा शाखेचे संघटक पंकज वंजारी हे आपल्या चमूसोबत करंजात दाखल झाले.
खोटी माहिती पसरवणे गुन्हा -
यात महालक्ष्मी बद्दल पुण्यावरून चालत आल्यात, अचानक प्रकट झाल्या अशा अनेक बाबी पसरलेल्या होत्या. मात्र, वास्तविकता त्यापेक्षा पूर्णतः वेगळी आहे. यामुळे अशा चमत्कार आदी बाबींवर विश्वास ठेवू नका. यासोबतच अशा पद्धतीने खोट्या बाबींना प्रचार करणे हे कायद्याने गुन्हा आहे. अशीही माहिती महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारी आणि त्याच्या सोबतच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना, कुटुंबियांना दिली.
असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे दिले लेखी -
दिवाकर मस्के यांच्याशी घरी जाऊन संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली. यावेळी स्थानिक पोलीसही उपस्थित होते. महालक्ष्मी या प्रगटल्या नसून असा कोणीही चुकीचा प्रचार करी नये अशी माहिती लेखी स्वरूपात त्यांनी लिहून दिली. गणपती स्थापना केली जात असून यंदापासून महालक्ष्मी स्थापना करण्यात आली, असल्याचे मस्के कुटुंबीयांनी सांगितले आहे. यावेळी अभा अंनिसचे दशरथ जाधव, राजकुमार तिरभाने, संगीता पाटील, नंदा नागले, विनोद पाटील, राणासिंग बावरी, विलास वानखडे, संजय नागपुरे, यांच्यासह अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - माढ्यात 10 वर्षांपासून मुस्लिम कुटुंबात मांडली जाते गौरी-गणपती