वर्धा - महात्मा गांधींचे 150 वे जयंती वर्ष साजरे होत असताना 'राष्ट्रसंत ते राष्ट्रपती' गांधी संकल्प यात्रा काढणार असल्याचे डॉ. विकास महात्मे यांनी सांगितले आहे. गांधीजींनी सांगितलेली मूल्ये आणि शिकवण सोबतच स्वच्छतेचा संदेश देत ही यात्रा काढली जाणार आहे. राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता गांधी संकल्प यात्रा असे नाव असणार आहे. या यात्रेची सुरूवात 15 जानेवारीला गुरुकुंज मोझरी अमरावती येथून होवून 19 जानेवारीला समारोप होणार असल्याची माहिती महात्मे यांनी दिली. ते अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा - 'उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी फडणवीसांना "लाथ" मारली'
या पदयात्रेच्या दरम्यान गावागावात स्वच्छता, प्लास्टिक कचर्यापासून साहित्य बनविणे याची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे दृष्टीने शेतीत इतर प्रयोग करण्याची प्रात्यक्षिकेही दाखवली जाणार आहेत. शेतीत मधमाशी पालन, रेशीम उद्योग, प्लास्टिक कचऱ्यापासून साहित्य निर्मिती, अशी संकल्पना या यात्रेत राबवली जाणार आहे. या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महात्मे यांनी केले.
हेही वाचा - वर्ध्यात ट्रॅक्टरला अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
ही यात्रा 18 गावांमधून रविवारी 19 जानेवारीला सेवाग्राम येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री अलका कुबल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमास पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस यांनाही आमंत्रीत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे सचिन अग्निहोत्री, भाजपचे प्रशांत इंगळे तिगावकर, गुंडू कावळे, अरुण लांबट, गिरीश कांबळे उपस्थित होते.