वर्धा - येथील आर्वी येथे एका शेतात भला मोठा 11 फूट लांब अजगर पाहून शेतमालकाला धडकी भरली. भाईपूर पुनर्वसन परिसरातील शेतात हा अजगर काल (सोमवार) दुपारी आढळून आला. अजगराने शिकार करत प्राणी गिळला होता. यावेळी मात्र, त्याने केलेली शिकार बाहेर फेकली. यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला वर्ध्याच्या करूणाश्रमात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
आर्वी तालुक्यात भाईपूर पुनर्वसन परिसरातील प्रवीण सावंत यांच्या शेतात अजगर असल्याची माहिती प्राणी मित्रांना मिळाली. त्याने नुकतीच रोहीच्या पिल्ल्याची शिकार केली होती. यावेळी त्याला आजू-बाजूला मानवी सहवास असल्याचे भासल्याने स्वतःचा रक्षणार्थ शिकार बाहेर फेकली असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी वन्यजीव सरक्षकांनी त्याला इजा होऊ नये, अशा पद्धतीने पोत्यात बंद केले. आर्वी वनपरिक्षेत्र कार्यलयात जाऊन अजगराची नोंद करून घेतली. यावेळी त्याची हालचाल सुस्त असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी दुडे यांच्या आदेशाने दोन वन विभागाच्या कर्मचारी वाय. पी. अरसड आणि व्ही. एस. मोहम्मद यांनी करुणाश्रम पिपरी मेघे, वर्धा येथे सुपूर्द केला.
हेही वाचा - वर्धा : बँकेचे साडेचार कोटी रुपये घेऊन जाणारी गाडी सत्याग्रही घाटात पलटी
यावेळी पीपल फॉर एनिमलच्या वतीने डॉ. संदीप जोगे यांनी पाहणी केली असता शिकार बाहेर फेकल्याने कमजोरी आल्याचे लक्षात आले. यावेळी योग्य औषधोपचार करण्यात आला असल्याची माहिती कौस्तुभ गावंडे यांनी ईटीव्ही भारतला दिली.
हेही वाचा - एकाच घरावर दोन झेंडे? वडील राष्ट्रवादीत, तर मुलगा व सून सेनेत; कार्यकर्ते म्हणतायेत कोणता झेंडा घेऊ हाती?
या अजगराला सुखरुप पोहचविण्यासाठी प्राणी मित्र तुषार साबळे, मनीष ठाकरे, रुपेश कैलाखे, गौतम पोहणे, अनिल माहूरे, मिलिंद मेश्राम, रिजवान शेख, संतोष पडोळे, आशुतोष जायदे, आशिष सोनकुसरे, प्रथमेश खोडे आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा - वर्ध्यात पाचशे रुपयांच्या वादातून युवकाची हत्या; अल्पवयीन मुलाला अटक, वडील फरार