वर्धा - पोळा हा सण शेतकऱ्यांनासाठी जसा आनंदाचा असतो तसाच बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरणारा तान्हा पोळा लहान बच्चे कंपनीसाठी आनंदाचा असतो. लाकडी नंदी घेऊन पोळ्यात जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. वर्धा शहरात भरलेला विविध चौकातील लहान चिमुकल्यांचा पोळा मात्र संदेशानी भरलेला पाहायला मिळाला.
यात नुकताच केंद्र सरकारने घेतलेला 370 कलम हटवण्याचा निर्णय असो की आरक्षण रद्द करण्याची मागणी असो. यावेळी पोळ्यात एका लहान चिमुकलीच्या हातात असलेला फलकावर "व्हाट्सअप, युट्युब, फेसबुक, कॅण्डी क्रश बंद करा. आम्हा मुलांवर लक्ष केंद्रित करा, वेळ द्या." असा संदेश दिला. वृक्ष लागवड करा वृक्ष तोड थांबवा, असेही फलक पहायला मिळाले.
कोल्हापूर, सांगली येथे महापुराने थैमान घातल्याने निर्माण झालेली परिस्थिती दाखवताना एका चिमुकलीने काही फोटोच वापर केला सोबत लहान टोपल्यात बसून पुरात अडकलेल्या लोकांची परिस्थिती मांडली. वात्सलय वाडीभस्मे नामक मुलाने अंगाला काळे लावून घेत एडीस मच्छराचे रूप साकारले. पावसाळा असल्याने मोठ्या प्रमाणात डेंग्यू आणि जपानी एनफ्लायटीस या सारखे जीवघेणे आजार डासांमुळे होत असल्याने यावर जनजगृती करण्याचा प्रयत्न केला.
स्त्री शक्ती दाखवताना "जब नारी मे है शक्ती सारी तो क्यो कहे इन्हे बेचारी" असा फलक घेऊन दुर्गेच्या रुपात संदेश दिला. अशाप्रकारे एक ना अनेक रूप वेशभूषा परिधान करत चिमुकल्यांचा यंदाचा पोळा हा संदेशानी भरलेला असल्याचे चित्र वर्धा शहरात दिसून आलेत. यावेळी आयोजकांनी लहान मुलांना भेटवस्तू चॉकलेट देऊन त्यांचे कौतुक केले गेले.