वर्धा - वर्ध्यातील सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वतीने कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा संकलन सुरू केले आहे. यामुळे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. प्लाझ्मा थेरपी सुरू असणारा वर्धा हा विदर्भातून दुसरा जिल्हा असणार आहे. येत्या काळात याचा फायदा नक्कीच होणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 10 आहे. यासह उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 353 आहे. या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तात प्रतिपिंडे (अँटीबॉडी) तयार होत असतात, ज्या कोरोना विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी शरीराला मदत करतात. यामुळे कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रुग्णांना बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा दिल्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि रुग्ण आजारातून लवकर बरा होतो. या सुविधेमुळे कोरोना संसर्गित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे.
सेवाग्राम रुग्णालयात प्लाझ्मा संग्रहणाला सुरवात प्लाझ्मा देण्यासाठी कोरोनावर आजवर मात करून रुग्णालयातून घरी पाठवलेले रुग्ण दाता ठरू शकतात. यात घरी गेल्यानंतर 28 दिवसांच्या कालावधीनंतर प्लाझ्मा दान करणे योग्य ठरते. प्लाझ्मा देताना सुमारे 45 ते 60 मिनिटांचा कालावधी लागतो. सेवाग्राम रुग्णलयात प्लाझ्मा संकलन सुरू झाले असून यात कोरोनामुक्त आणि 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असल्यास ते स्वतःहून पुढे येऊन प्लाझ्मा-दाता होऊ शकत असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिकाधिक रुग्णांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे. एमजीआयएमएस सेवाग्राम व कस्तुरबा रुग्णलयात कोरोना उपचारासाठी आवश्यक सोयी सुविधेसोबत प्लाझ्माच्या माध्यमातून उपचार करता येणार आहे.सेवाग्राम रुग्णालयात प्लाझ्मा संग्रहणाला सुरवात कोरोनातून बरे झालेले उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार हे प्रथम प्लाझ्मा-दाता ठरले आहे. तसेच, कोविड संसर्गातून बऱ्या झालेल्या एका युवकानेही प्लाझ्मा दान केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे विश्वस्त पी. एल. तापडिया, सचिव डॉ. बी. एस. गर्ग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे डीन डॉ. नितीन गंगणे, पॅथॉलॉजी विभागातील प्राध्यापक तथा प्रमुख डॉ. अनुपमा गुप्ता, ब्लड बॅंकेचे प्राध्यापक आणि प्रभारी व्ही.बी. शिवकुमार उपस्थित होते.