वर्धा - अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच खड्ड्यांमुळे सर्व नागरिकांसाठी डोकेदुखी सहन करावी लागत आहे. यासाठी गांधीगिरीचा मार्ग वर्धेकरांनी अवलंबत शहरातील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर फलक लावत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा- भाजपची तटस्थ भूमिका? शिवसेना करणार सत्तास्थापनेचा दावा
शहरातील रेल्वे स्टेशकडे जाणाऱ्या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सर्वसामान्य नागरिक असो की अजून कोणीही दिवसातून एकदा तरी या मार्गाने जातोच. याच मार्गावर मुख्य भाजीपाला बाजार आहे. मात्र, येथील खड्ड्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त आहेत. अमृत योजनेअंतर्गत अंडरग्राउंड पाईपलाईनसाठी शहरातील मुख्य मार्गासह अनेक भागात रस्ते खोदकाम करण्यात आले. नव्याने बांधण्यात आलेले सिमेंट रस्ते खोदून रस्त्याचे चित्र बदलून टाकले आहे. विकास कामाला समर्थन म्हणून लोकांनी प्रतिसाद दिला. मात्र, वाढता त्रास पाहता फलक लावण्याची वेळ आली आहे.
फलक लावून वेधले लक्ष
"वर्धा नगर परिषद कृपा करुन हे खड्डे आणि रस्ता दुरूस्त करावे, ही नम्र विनंती. आपला एक प्रामाणिक करदाता वर्धेकर" अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासन करदात्याच्या गांधीगिरीकडे लक्ष देईल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.