वर्धा - देवळी तालुक्यातील आंदोरी येथे नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सासऱ्यानेच सुनेवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून देवळी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रसंगी पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे.
आंदोरी येथील हातकरणार हे कुटुंब असून या घरात ४ लोक राहतात. २० फेब्रुवारीला मुलगा घरात नसताना पीडित सून तिच्या लहान मुलीजवळ झोपून होती. यावेळी सासऱ्याने जोर जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सासऱ्याने दिली.
घटनेनंतर शुक्रवारी (२२ फेब्रुवारीला) सुनेने आपल्या आई-वडिलांना फोनवरून ही आपबिती सांगितली. यावेळी त्यांनी आंदोरी येथे येऊन मुलीला घेऊन गेले. दरम्यान, माहेरी गेल्यानंतर आज पीडितीने आईसोबत जाऊन देवळी पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी देवळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हलकर यांनी गुन्हा दाखल करत अटक केल्याची माहिती दिली.