वर्धा - यंदा वरुणराजा कोपला असल्याची काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिन्याचा पंधरवाडा ओलांडून गेल्यानंतरही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी फटका बसू लागला आहे. यामुळे वरुणदेवाला होम-हवन करुन साकडे घातले जात आहे. शहरातील आर्वी नाका चौकातील माँ दुर्गा पूजा उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी या होम-हवनचे आयोजन करण्यात आले होते.
पावसाने दांडी मारल्याने मागीलवर्षीही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यातच यंदाचा पाऊस सरासरीच्या तुलनेत तब्बल 200 मिलिमीटर कमी झाला आहे. त्यामुळे आधीच कोरडे पडलेले धरण, आता त्यातील मृतसाठासुद्धा संपलेला असल्याने पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या उद्भवलेली आहे. धाम नदी प्रकल्पातही शुन्य पाणीसाठा असून मृत जलसाठ्याचाही उपसा झाल्याने पिण्याचा पाण्याचे संकट वर्धा शहरावर घोंगावत आहे.
शेतकऱ्याची पिके पाण्याअभावी करपू लागली आहे. पाणीच नसल्याने अनेकांनी दुबार पेरणी सुद्धा केली आहे. आता तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ काही शेतकाऱ्यांवर आली आहे. यामुळे वरुण राजाला साकडे घालण्यासाठी होम देऊन आहुत्या दिल्या जात आहे. 'भरभरून पाऊस बरसू दे आणि शेतकऱ्यांचे रान हिरवेगार होऊ दे', अशी आर्त हाक या माध्यमातून दुर्गा पूजा उत्सव समिती मंडळाच्या वतीने करण्यात आली. साधरण अडीच ते तीन तास ही पूजा चालली.
या होमपूजेत मंडळाचे आनंद अवथळे विनोद इटनकर, शंकर शेंडे, बाबाराव लांडगे, सुनील गावंडे, मनोज मुरारका, संजय पेठे राहुल शहाडे, मुरलीधर लेवाडे आदि सहभागी झाले होते.