वर्धा - नागपूर ते वर्धा मार्गावर सेलूजवळ शाळेची बस आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी वाहन थांबत नव्हते. मात्र, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या वाहनातून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. यामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळाले.
अभी ईश्वरकर, असे मृताचे नाव आह. रमना फाट्याजवळून स्कूल ऑफ ब्रिलियंटची बस विद्यार्थ्यांना सोडून कान्हापूरला जात होती. यावेळी दुचाकीस्वारानी कार आणि बसच्या मधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बस आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला. बघ्यांनी नेहमीप्रमाणे जखमींना रुग्णालयात नेण्यापेक्षा व्हिडिओ फोटो काढण्याकडे लक्ष दिले. मात्र, माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी वाहन थांबत नव्हते. एवढ्यात उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे हे सेलूकडून येत होते. त्यावेळी अपघात दिसताच ते थांबले. त्यांनी तत्काळ जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेण्यास सांगितले. यामध्ये अभी ईश्वरकरला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच स्वप्नील लक्ष्मण सोमनकर आणि समीर देऊळकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे वाचलं का? - साताऱ्यातील 'त्या' काळरात्रीला आज 52 वर्षे पूर्ण
सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील गाडे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे यांनी घटनेचा पंचनामा करीत वाहतूक सुरळीत केली. तसेच यावेळी दुचाकीवरील एका तरुणाच्या खिशात धारदार चाकू आढळून आला. त्यामुळे तो चाकू नेमका कशासाठी आणला? तसेच ते भरधाव वेगाने कुठे जात होते? याचा शोध पोलीस घेत आहेत.