वर्धा - कुत्रे मागे लागल्याने उंच भिंतीवरुन उडी मारुन नीलगाय घरात घुसली आणि वयोवृद्ध महिलेला किरकोळ दुखापत केली. ही धक्कादायक घटना देवळी शहरात रविवारी सकाळच्या सुमारास घडली.
देवळी शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मधल्या के लेआऊट येथे पार्वता प्रकाशराव धुमाळ या कुटुंबीयांसह राहतात. सकाळच्या सुमारास त्या घराच्या पुढच्या खोलीत झोपून होत्या. सकाळी घरात काही शिरल्याची त्यांना शंका आली. त्यावेळी त्यांना नीलगाय दिसताच त्या खडबडून जाग्या झाल्या. नीलगाईला पाहून पार्वता धुमाळ यांना धक्काच बसला. नीलगायीने अचानक त्या महिलेवर हल्ला केला. त्यात धुमाळ किरकोळ जखमी झाल्या.
रात्रीच्या वेळी ही नीलगाय परिसरात फिरत होती. नीलगायीच्या मागे कुत्रे धावले आणि सैरावैरा पळणार्या नीलगाईने चार ते पाच फूट उंच भिंतीवरून उडी घेत घरात प्रवेश केला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. लागलीच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आणि तब्बल अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर नीलगायीला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. वनविभागाच्या चमूने जखमी नीलगाईला पकडून पिपरी येथील करुणाश्रमात नेले. नीलगाईला पकडण्याच्या कामगिरीत क्षेत्र सहाय्यक एस.आर. परखडे, व्ही.बी. सोनवणे, जे.बी. शेख, एस.डी. दांडगे, आर.एन. खुडके यांचा समावेश होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.