वर्धा : आमदार नितेश राणे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे दोन दिवसांआधी भाजपच्या एका कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांनी खासदार अमोल कोल्हेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आर्वी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
नितेश राणेंविरोधात तक्रार : भाजपच्या वतीने सरपंच व उपसरपंच यांच्या सरकारचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. त्यात भाजपचे आमदार नितेश राणे हे प्रमुख आकर्षण होते. यादरम्यान नितेश राणे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी व राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यानी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत शिवीगाळ केल्याने अखेर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वर्ध्यातील आर्वी पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. ही तक्रार राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी दिली.
राणेंचे वादग्रस्त वक्तव्य : वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आर्वी येथे सुरु असलेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या कार्यक्रमाला नुकतेच निवडुन आलेले नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच आले होते. त्या भरगच्च कार्यक्रमात नितेश राणे यांनी भाषणादरम्यान राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची दाढी काढली तर कोणी ओळखणार नाही, तो पैशासाठी भूमिका करतो त्याला संभाजी महाराज काय कळतात अशी खोचक टीका त्यांनी केली.
वक्तव्याची क्लिप पोलिसांनी दिली : आमदार नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठे आक्रमक झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी आमदार नितेश राणेंविरोधात आर्वी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे क्लिप व पेन ड्राइव्ह सुद्धा पोलीसांना दिले.