वर्धा - घरगुती वादातून भाच्याने मामावर धारधार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना समुद्रपूर येथे घडली. भोजराज रामचंद्र झोडापे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. तर कमलेश मोरे, असे आरोपीचे नाव आहे.
भोजराज झोडापे हा आपल्या सहकुटुंबासह स्वतःच्या घरी राहत होता. त्याच्या सोबत काही दिवसा अगोदर त्यांचा भाचा कमलेश मोरे हा सुद्धा राहायला आला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी आरोपी कमलेशने प्रेमविवाह केला. पत्नीसह समद्रपूर येथे मामाकडे १५ दिवस राहायला होता. त्यानंतर घरापासूनच १०० मीटर अंतरावर भाड्याने राहण्यासाठी त्याने घर घेतले.
आज गुरुवारी मामा-भाच्यामध्ये घरगुती कारणावरुन वाद झाला. रागाच्या भरात त्याने मामाच्या पोटावर धारधार शस्त्राने सपासप वार केले. यात रक्तस्त्राव झाल्याने मामाचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर कमलेश हा घटनास्थळावरुन फरार झाला. याप्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलीस उपनिरीक्षक मिलींद पारडकर तपास करीत आहेत.
आरोपी भाचा कमलेश मोरे याला समुद्रपूर पोलिसांनी जयताळा परिसरातून अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येच्या कारणासह पुढील तपास डीबी पथकाचे प्रमुख अरविंद येनूरकर, आशिष गेडाम, रवी पुरोहित, धनंजय पांडे करत आहेत.