वर्धा - आर्वी येथे घडलेल्या दुर्देवी घटनेमध्ये जखमी झालेल्या चिमुकल्याची रुग्णालयामध्ये खासदार रामदास तडस यांनी भेट घेतली. प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊन पीडित मुलाच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच त्या कुटुंबाला २५ हजार रुपयांची शासकीय मदत, तर ५ हजार रुपयांची वैयक्तीक मदत त्यांनी यावेळी दिली.
खासदार रामदास तडस यांना महिती मिळताच वर्धा येथील जिल्हा समान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी ८ ते १० दिवसात रुग्णालयातून सुट्टी होण्याची शक्यता आहे. सध्या चिमुकल्याची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगितले.
घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून कुठल्याही सामान्य मानसाच्या मनामध्ये चिड आणि रोष निर्माण करणारी आहे. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. त्यामुळे कठोर शिक्षा मिळवण्याच्या दृष्टीने तपास करण्यास पोलीस उपविभागीय अधिकारी दिनेश कोल्हेंना सांगितले असल्याचे तडस म्हणाले. हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यासाछी शासनाकडे विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी दक्षता समितीची बैठक घेतलेली आहे. या प्रकरणी अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कायद्या अंतर्गत बालकाला तातडीने २५ हजाराची मदत देण्यात आली. धनादेश हा समाज कल्याण अधिकारी यांच्या मार्फत पीडित मुलाच्या कुटुंबीयांना देण्यात आला. या कायद्याअंतर्गत १ लाख मदतीची तरतूद असून पुढील मदत टप्प्या टप्प्याने दिली जाईल, असेही तडस म्हणाले.
काय आहे प्रकरण?
आर्वी येथील गुरुनानक चौकात जोगणामाता मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात शनिवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास हा मुलगा खेळायला गेला होता. यावेळी आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे हा सुद्धा मंदिर परिसरात पोहोचला. त्यानंतर आरोपीने मुलाला विवस्त्र करून तापलेल्या टाईल्सवर( फरशी) बसवले. विना चपलीने जिथे बसणे शक्य होत नाही, तिथे आरोपीने त्याला नग्नाअवस्थेत बसवले होते. एवढेच नाही तर क्रूर पद्धतीने मुलाला जबरदस्तीने टाईल्सवर दाबून धरले होते. टाईल्स तापलेली असल्याने मुलाला जोरदार चटके बसले. यामुळे चिमुकला जखमी झाला होता.