वर्धा - शिवसेनेने युतीद्वारे निवडणूक लढवली आणि सत्तेसाठी विरोधकांसोबत हातमिळवणी केली. या आघाडी सरकारने विदर्भावर सातत्याने अन्याय केला. विदर्भातील शेतकऱ्यांचे यंदा खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी पिकाचे नुकसान झाले. पण, सरकारने तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना दिली. हे सरकार केवळ बदल्या करण्यात खुश असल्याचेही खासदार रामदास तडस यांनी सांगत सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यकाळावर टीका केली.
यात नागपूर जिल्ह्याला 65 लाखाची मदत, वर्धेला 58 लाख, भंडाऱ्याला 10 कोटी, गोंदियाला 2 कोटी, चंद्रपूरला 62 लाख तर गडचिरोली 2 कोटी, अशी पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना 17 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तेच वर्धा जिल्ह्यात जवळपास 80 टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तेच कपाशिचेही नुकसान 50 टक्याच्या घरात असून नुकसान दिवसागणीक वाढत चालले आहे.
या सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना हात आखूड केला आहे. तेच बदल्या करण्यात मात्र कठोर भूमिका घेतली आहे. बदल्यांचा सपाटा लावण्याचे काम केल्याने हे बदल्यांचे सरकार असल्याचाही आरोप खासदार रामदास तडस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे. वीज बिलाच्या माफीवरही सरकारने शब्द बदलवत सामान्य नागरिकांवर अन्याय केला असल्याचेही ते म्हणाले.