वर्धा - राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अनेक दुर्धर आजाराचे निदान केले जाणार असून याच्या माध्यमातून नागरिकांनी उपचार मिळवत निरोगी आयुष्य जगावे. तसेच सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना कराव्यात, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले आहे. ते जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रोगनिदान उपचार आरोग्य प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
आयुष्मान योजनेअतर्गंत ५ लाखापर्यंत उपचार तसेच शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. या योजनेतून १३५५ रोगांवर मोफत उपचाराची सोय निर्माण झाली असल्याचेही ते म्हणाले. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये हृदयरोग, कँसर, मूत्ररोग, वंध्यत्व या विभागाचे तज्ञ डॉक्टर आहे. तसेच मोठमोठ्या तपासण्या या महाशिबिरातून केल्या जाणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी दिली.
महाआरोग्य शिबीर बुधवार आणि गुरुवारी असणार आहे. या दोन दिवसात जवळपास पाच हजार रुग्णाची तपासणी या माध्यमातून होणार आहे. पहिल्याच दिवशी 2 हजारपेक्षा जास्त रुग्णाची नोंदणी झालेली आहे. या शिबीरात केवळ तपासणीच नाही तर शस्त्रक्रिया सुध्दा केल्या जाणार आहे. मधुमेह, किडनी यासारख्या आजार असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून रोग निदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सीईओ अजय गुल्हाने, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ. गर्ग, सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी,आरोग्य अधिकारी अजय डवले, लॉयन्स डॉ धाकटे, एटीएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. नितीन निमोदीया आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.